ठाणे - गेल्या २४ तासात उल्हासनगरमध्ये १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर बदलापूर शहरात नव्याने ३ रुग्णांची भर पडली असून येथील रुग्णांचा आकडा ४८ वर गेला आहे. मात्र, अंबरनाथमध्ये आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने अंबरनाथ शहरातील बाधितांची संख्या १३ वर पोहोचली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील सम्राट अशोकनगर परिसरातील एका करोनाबाधित महिलेच्या संपर्कातील ११ नतेवाईकांना करोनाची लागण झाली आहे. तर शांतीनगर परिसरात राहणाऱ्या आणि वडाळा येथे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील आणखी पाच नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. तर इतर एक नागरिक अशा १७ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी मध्यरात्री प्राप्त झाल्याने उल्हासनगर शहरात एकाच दिवशी १७ रुग्ण वाढल्याने खळबळ उडाली आहे. उल्हासनगर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शनिवारी ३५ वर गेली आहे.
बदलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणखी 3 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यातील एक महीला रुग्ण ही उल्हासनगरमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. तर दोन रुग्ण हे रुग्ण मुंबई येथे अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे बदलापूर,शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शनिवारी संध्याकाळी ४८ वर पोहोचली होती. तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशनमधील आणखी एक पोलीस कर्मचारी बाधित झाला असून, अंबरनाथ शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ वर गेली आहे.