ठाणे - कळवा येथील अटकोनेश्वर नगरच्या आदर्श चाळीजवळचा डोंगराचा काही भाग मंगळवारी पहाटे जवळच्या घरावर कोसळल्याने त्या घराची भिंत पडली. सदर ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली एकून ३ व्यक्ती अडकले होते. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. बीरेंद्र गौतम जसवार (४०), सनी जसवार (१०), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमी निलम (गुढीया) जसवार (३५) हिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळावा येथे ज्ञानगंगा शाळेजवळील आदर्श चाळ लगत परिसरात दरड कोसळून जवळच्या घरावरती पडल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली ३ व्यक्ती अडकून पडले. यावेळी घटनास्थळी अग्नीशमन कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी ढिगारा उपसून अडकलेल्यांना बाहेर काढले. घटनेतील जखमींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी दोन जणांना मृत घोषित केले तर जखमी तर निलम जसवार हिच्या हाताला दुखापत झाली असून तिला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.
या ठिकाणी आदर्श चाळी लगतचा डोंगराचा काही भाग धोकादायक असल्यामुळे सदर ठिकाणाहून एकून २० कुटूंबातील ७० रहिवाशांना जवळच्या ज्ञानगंगा शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.