ठाणे - शिवाईनगर येथे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर दोन दिवसांपूर्वी बेकायदेशीर दफनविधी करण्यात आलेला आहे. केवळ ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच हा दफनविधी झाला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला हा भूखंड आंदन देऊनही त्याने खेळाचे मैदान उभारले नाही. परिणामी, भर लोकवस्तीमध्ये हा दफनविधी करण्यात आला आहे, असा आरोप ज्येष्ठ आंबेडकरी नेते जितेंद्रकुमार इंदिसे यांनी दिला आहे.
शिवाईनगर येथे सुमारे साडेपाच एकरचा भूखंड आहे. या भूखंडाचा सुमारे सव्वालाख चौरस फुटाचा 'टीडीआर' एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने वापरला आहे. त्या बदल्यात भूखंडावर खेळाचे मैदान विकसित करून देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, ठाणे महापालिकेने यासाठी संबधित बांधकाम व्यावसायिकावर दबाव टाकला नाही. तसेच भूखंड ताब्यातही घेतला नाही. याचा फायदा घेऊन या परिसरातील एका चर्च व्यवस्थापनाने या भूखंडावर बुधवारी बेकायदेशीरपणे एका मृत व्यक्तीचे दफन केले आहे. यावेळी अनेकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या विरोधास ते जुमानले नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या दफनविधीमध्येही संशयाचे वातावरण दिसून येत असल्याचा आरोप इंदिसे यांनी केला आहे.
परिसरात साई आनंद सोसायटी, जानकादेवी झोपडपट्टी, लिटील फ्लॉवर शाळा, लक्ष्मीनारायण सोसायटी, रवी इस्टेट सोसायटी इत्यादी नागरीवस्ती आहे. या वस्तीमध्ये स्मशानभूमी असू नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, पालिका अधिकाऱ्यांमुळेच ही वेळ आली असल्याचे इंदिसे म्हणाले. येत्या ८ दिवसांत हा भूखंड ताब्यात घेतला नाहीतर, बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा इंदिसे यांनी दिला आहे.