नवी मुंबई - सध्या देशात व राज्यभरामध्ये कोविड-19 या आजारामध्ये उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा आहे. मात्र, सध्या काही लोक या औषधाची चढ्या भावात विक्री करून काळाबाजार करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी जी शेखर पाटील व पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी दिले होते. त्यानुसार कळंबोली येथून एका प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अटक केले आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या बातमीनुसार पनवेल खांदा कॉलनी, येथील खानदेश हॉटलसमोर एक व्यक्ती रेमडेसिवीर औषधाच्या प्रत्येक मात्रेसाठी 35 हजार रुपये दराने काळा बाजार करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सपोनि प्रवीण फडतरे, पो.ह.अनिल पाटील, साळूंखे, रुपेश पाटील, सचिन पवार, सुनील कुदळे, सूर्यवंशी, सचिन म्हात्रे यांनी सापळा लावला व राहुल देवराव कानडे (वय 38) या कळंबोली येथे राहणाऱ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाला ताब्यात घेतले.
रेमडेसिवीरचे तीन डोस अवैधरित्या आढळून आले
संबधित व्यक्तीकडे हेंट्रो, सिप्ला, रेमविन या कंपनीची 3 इंजेक्शन मिळून आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, रायगडचे सहायक आयुक्त गिरीश हुकरे तसेच औषध निरीक्षक मंजितसिंग राजपाल यांच्या सहकार्याने केली. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखीन काहींना अटक होण्याची शक्यता असून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष - 02 पनवेल करीत आहेत.