ठाणे - काँग्रेसकडून कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे भिवंडी, शहापूर येथे झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे.
शहापूरमधील आज कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो कुणबी समर्थकांनी काँग्रेसविरोधात रोष व्यक्त केला. तर दुसरीकडे भिवंडी, शहापूर येथे झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात अजूनही वेळ गेलेली नाही पाटलांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, भिवंडी लोकसभा मतदारसंघात या आधीच वंचित बहुजन आघाडीने डॉ. अरुण सावंत, हे कुणबी समाजाचे उमेदवार मैदानात उतरवले आहे. यामुळे भिवंडी लोकसभेत ३७ टक्के असलेल्या कुणबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा सर्वाधिक फायदा वंचित आघाडीला होणार आहे. यामुळे भिवंडी मतदार संघात काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडी, अशी तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे
काँग्रेसने २००९ चे विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे मोदी लाटेतही त्यांनी ३ लाखांच्यावर मते मिळाली. मात्र, यावेळी काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले आणि २००९ मध्ये निवडून आलेले माजी खासदार टावरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर पाटील काँग्रेसवर आगपाखड करत कुणबी सेनेचे ठिक-ठिकाणी मेळावे आयोजित करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत.
भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड तालुक्यात लाखोंच्या संख्येने कुणबी समाजाची मते आहेत, गेल्या महिन्याभरापासून पाटील साहेबांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल. या आशेवर कुणबी सेनेमधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते होते. मात्र, टावरे यांना तिकीट जाहीर झाल्याने कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांचा कल वंचित बहुजन आघाडीकडे असल्याचे समोर आले आहे.