ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश कदम यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली वाहतुकीच्या नियमांचे परिपूर्ण पालन करत काढण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश कदम हे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आव्हान आहे.
निवडणुकीच्या धामधुमीमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याचे प्रकार अनेकवेळा आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र, आज मनसेने हा पायंडा मोडीत काढत हेल्मेट परिधान करत रॅली काढली. दरम्यान, या रॅलीत 'हेल्मेट घाला आणि आपला जीव वाचवा' असा असा संदेशही या निमित्ताने या बाईकस्वारांनी दिला.
याविषयी बोलताना महेश कदम म्हणाले की, 'रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. हेल्मेट वापरले तर कदाचित आपला जीव वाचू शकतो. हा संदेश देण्याचा आज प्रयत्न आम्ही केला आहे.'
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तरी चांगले आणि नवीन काम दाखवून द्यावे, ज्याने लोकांचे भले होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ 'क्लस्टर'चे गाजर दाखवण्यात आले आहे. एकही विधायक असे काम मतदारसंघात झालेले नाही. त्यामुळे या मतदारसंघाच्या विकासासाठी लोकांनी मनसेलाच मतदान करावे, असे आवाहन कदम यांनी केले.
दरम्यान, अनेकवेळा कार्यकर्ते वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली करताना दिसून येतात. मात्र मनसेने वाहतुकीच्या नियमांचे पालन करत केलेला प्रचार हा चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा - भाजप जिल्हाध्यक्षांशी विकासाच्या मुद्यांवर कार्यकर्त्यांची हमरीतुमरी; व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - माझ्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे प्रकाश आंबेडकरांना भीमा कोरेगाव आंदोलनात यश मिळाले - रामदास आठवले