ठाणे : हजारो शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यातुन मुबंईच्या दिशेने जात आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातून रविवारी लॉंग मोर्चाला किसान सभेचे नेते अजित नवले, माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प दर, वनजमिनींचा प्रश्न, गॅस दरवाढ यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मार्च आहे. आज पाचव्या दिवशीही हजारो कष्टकरी, शेतकरी, आदिवासी बांधव मोर्चात सहभागी होऊन उन, पाऊस अंगावर झेलत मुबंईच्या दिशेने हे लाल वादळ घोंगावत पुढे जात आहे.
हजारोंच्या संख्येने महिला सहभागी : या लाँग मार्चमध्ये महिला वर्गही हजारोंच्या संख्येने आपल्या मागण्यांसाठी सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे लॉंग मार्चसोबतच टेम्पो आणि इतर वाहनामध्ये जेवणाची भांडी आणि धान्य तसेच ज्या ठिकणी जेवणाची वेळ असेल, त्या ठिकाणी चूल मांडून लाँग मार्चमधील काही महिलांसह शेतकरी हजारो मोर्चेकरांसाठी सकाळच्या नाश्त्यासह, दुपार आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करताना दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या हातात लाल बावटा : हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थित लाल वादळ ठाणे जिल्ह्यातील मुंबई - नाशिक महामार्गावर चालत आहे. त्यामुळे एकेरी वाहतूकीसाठी महामार्गावर वाहनांच्या अवाजावी सुरु ठेवली आहे. या लॉंग मोर्चात हजारो शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्ध इतकेच काय? तर लहान चिमुकलेही पायी रस्ता तुडवत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. हजारो शेतकऱ्यांनी हातात लाल बावटा घेतल्यामुळे महामार्ग लालभडक झालेला दिसत आहेत.
मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात : दरम्यान, शेतकऱ्यांचा लाँग मार्चने ठाणे जिल्हातील पहिल्या दिवशी शहापूर तालुक्यात रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईकडे मार्गस्थ झाला. आज भिवंडी तालुक्यात मुक्काम असणार आहे. यामधील पहिला मुक्काम पडघा हद्दीतील कोशिंबी गावात आहे. दुसऱ्या दिवसाचा मुक्काम भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात होणार आहे. त्यानंतर हा लाँग मार्च ठाणे शहरात प्रवेश करणार आहे. यासाठी लाँग मार्च वेळी काही अनुसूचित प्रकार घडू नये, म्हणून ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने नाशिक मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला.
शेतकरी आजारी पडले : दरम्यान, लाँग मार्चमध्ये आपल्या मागण्यांसाठी पायी चालणारे काही शेतकरी आजारी पडले आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पायी चालणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या पायाला सूज येऊन दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मलमपट्टी करून उपचार केले जात आहे. एकदंरीत शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी मुख्ममंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात? याकडे लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी, भूमिहीन, कष्टकरी यांचे लक्ष लागले आहे.