ठाणे - महाडपाठोपाठ भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. महापालिका क्षेत्रातील २८४ धोकादायक आणि १८७ अतिधोकादायक इमारतींची यादी नुकतीच जाहीर केली होती. तसेच इमारत पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण (प.) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आंबेडकर रोडवरील कृष्णा सिनेमाच्या आवारातील तळमजला अधिक तीन मजले इमारत पाडण्याची कार्यवाही आज सकाळपासून सुरू करण्यात आली आहे.
ही इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती. या अतिधोकादायक इमारतीत सद्यस्थितीत रहिवासी नसून तळमजल्यावर काही दुकानांचे गाळे आहेत. या दुकानांचे गाळे रिकामे करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच अंतिम नोटीस बजावली होती.
तीन दिवसांपूर्वी या इमारतीचा काही भाग पडल्याची तक्रार महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे प्राप्त झाली होती. लगेच 'क प्रभाग' क्षेत्रातील अतिक्रमण विरोधी पथकाने, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकातील पोलीस, १ पोकलेन, १ जेसीबीच्या मदतीने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी तळमजल्यावरील सर्व दुकानांचे गाळे रिकामे करण्यात येऊन आज तोडक कारवाईला सुरुवात केली आहे.