ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र ७ किलोमीटरच्या घाटातील प्रवासादरम्यान वाहनांवर दरड कोसळण्याची भीती तसेच संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने अपघाताची भीती चालकांना वाटत आहे. मात्र महामार्ग प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
नागमोडी वळणांवर निकृष्ट दर्जाचे बांधकाम -
मुंबई-नाशिक महामार्गावरून कसारा घाटात प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. या घाटात नागमोडी वळणांवर निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे संरक्षण कठडे, डोकावणाऱ्या दरडी, तुटलेला रस्ता, खड्डे यामुळे रोजच अपघात होतात. पावसाळ्यात तर संपूर्ण कसारा घाटातील ७ किलोमीटरचा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत असतो.
![पुलावरील तुटलेले संरक्षक कठडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-5-kasara-1-vis-2-photo-mh-10007_24062021193847_2406f_1624543727_971.png)
अनेक मालवाहतूक ट्रकांचा दरीत कोसळून अपघात -
कसारा घाटातील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. मात्र यंदा नालेसफाई झाली नाही. तसेच घाटातील तुटलेले संरक्षण कठडे दुरुस्त केले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व त्यांनी नेमलेले ठेकेदार कंपनी अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली थातूर-मातुर कामे करून बिल काढण्याचे काम करतात. या महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्यांना नागमोडी वळणे, कमकुवत संरक्षण कठडे यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडतात. शिवाय जुन्या कसारा घाटाच्या खालून रेल्वे मार्ग जात असल्याने अनेक मालवाहतूक ट्रक दरीत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे ट्रकपर्यंत जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी ट्रक घाटातून रेल्वे रुळापर्यंत दरीत कोसळून अपघात झाला होता.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा बळी -
मुंबई - नाशिक महामार्ग घाट बनवताना सुरुंगाच्या स्फोटाचा वापर करण्यात आला. त्यामुळे घाटातील दरडी कमजोर झाल्या आहेत. पावसाळ्यात दरवर्षी महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत दिल्ली रिसर्च सेंटरने महामार्ग प्राधिकरणाशी पत्र व्यवहार करून या दरडींना संरक्षण जाळी लावण्याच्या सूचना देखील दिल्या. मात्र याकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष आहे. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीचा कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा नाहक जीव जात असल्याचा आरोप आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचे अध्यक्ष शाम धुमाळ यांनी केला आहे.