नवी मुंबई - राज्यात कडक निर्बंधांची घोषणा करून देखील विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या, तसेच क्रिकेट, व्हॉलिबॉलसारखे खेळ खेळणाऱ्यांवर नवी मुंबई पोलीस पथकाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार काल कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार कामोठे वसाहतीमधील 90 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये महिला आणि वयोवृद्धांचा देखील समावेश आहे. या कारवाईनंतर अनेकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचा प्रकार देखील घडला.
हेही वाचा - ठाणे : ऑक्सिजन अभावी युनिव्हर्सल रुग्णालयातील 12 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले
संचार बंदी असूनही विनाकारण फिरत होते नागरिक
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 1 मे पर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता इतर व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव आहे. असे असताना देखील अनेक रहिवाशी विनाकारण रत्यांवर फिरताना दिसून येत आहेत. अशाप्रकारे निर्बंधांची पायमल्ली करणाऱ्यांवर सध्या पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
कामोठे वसाहतीमध्ये इव्हीनिंग वॉकसाठी घरातून बाहेर पडणाऱ्या, तसेच मोकळ्या मैदानात क्रिकेट मॅच आणि व्हॉलिबॉल खेळणाऱ्यांना अटक करून कामोठे पोलिसांनी त्यांचावर कारवाई केली आहे. जवळपास 90 हून अधिक रहिवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये महिला आणि मुलीचा व वयोवृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे. या सर्वांना कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करून त्यांना समज देण्यात आली. तसेच, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून 500 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला.
हेही वाचा - ठाणे जिल्हा परिषदेच्या सभापतींनी कोविड रूग्णांसाठी दिले स्वतःला मिळणारे मानधन