ठाणे - कल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत १०० फुट रस्त्यात बाधित होणारी ४२ (खोल्या) बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई कल्याण डोंबिवली महापालिकेने केली. या कार्याद्वारे महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला.
हेही वाचा - मुरबाड - माळशेज रोडवर कार आणि दुचाकीमध्ये अपघात; १ विद्यार्थी ठार, तर ४ गंभीर
३० मीटर रस्त्यात बाधित होणारी बांधकामे निष्कासित
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ५/ड प्रभाग क्षेत्र परिसरात, कल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत ३० मीटर रस्त्यात बाधित होणारी बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, उप अभियंता प्रशांत भुजबळ यांनी ५/ड व ४/जे प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथकामार्फत व महानगरपालिकेच्या पोलीस पथकाच्या सहकार्याने केली.
वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत
या कारवाईत रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी एकूण ४२ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. या रस्त्याची लांबी २.४ किमी असून रुंदी ३० मीटर (१०० फूट) आहे. ही कारवाई करताना बाधित बांधकामधारकांनी सहकार्य केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. हा रस्ता पूना-लिंक रस्त्याला समांतर रस्ता असून हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पूना-लिंक रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
अनधिकृत बाधकामांवरही कारवाई
तर महापालिकेच्या ९/आय प्रभागातील, पिसवली परिसरातही प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी आय प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथक व पोलीस पथक यांच्या सहाय्याने दिवस भरात १० अनाधिकृत बांधीव जोते व ८ अनाधिकृत रुमवर निष्कासित करण्याची धडक कारवाई केली.
हेही वाचा - ओएलएक्सवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीच्या बहाण्याने लोखो रुपयांची फसवणूक