ठाणे- गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड लॉकडाऊन संपेपर्यंत एक लाख फूड पॅकेट्सचे वाटप करणार आहेत. गेले 6 दिवस प्रशासन, आरोग्य विभाग, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस,पोलीस बांधव हे जीवाचे रान करून काम करत आहेत. या सर्वांचे तसेच निराधार नागरिक, बेघर लोक, वयोवृद्ध नागरिक, बाहेरून शिकायला आलेले विद्यार्थी यांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. या सर्वांना दोन वेळचे जेवण, पाणी पुरवण्यास गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सुरूवात केली आहे. ते स्वतः सबंध ठाणे शहरात फिरून गरजवंताना फूड पॅकेट आणि पाण्याचे वाटप करत आहेत.
ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील एक मोठा घटक सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे अतिशय हतबल झाला आहे. बेघर आणि निराधार, नाका कामगार यांच्या हाताला काम नसल्याने त्यांना उपाशी पोटी झोपावे लागत होते. त्याचवेळी जनतेच्या रक्षणासाठी रात्रीचा दिवस करणारी प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस यांचीही कामाच्या ठिकाणी उपासमार होत होती. त्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी ठरवून त्याची लगेच अंमलबजावणी देखील केली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी त्यांनी ५ हजार फूड पॅकेट्सचे वाटप केले आहे. पुढील दिवसात हे अन्न वाटप असेच सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
"कोरोनामुळे सुरू असणारा लॉकडाऊन संपुष्टात येईपर्यंत, ठाणे परिसरातील निराधार नागरिक,बेघर बांधव, डॉक्टर आणि नर्सेस, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, तसेच ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी रोज किमान 5 हजार खाद्यपदार्थांच्या पॅकेटचे वितरण करण्यास सुरुवात केली आहे. पुढील 20 दिवसात किमान 1 लाख खाद्यपदार्थ पॅकेट्सचे वितरण करण्याचा हा संकल्प आहे. आजपासून ही मोहीम सुरू केली आहे.
मी आणि माझी संपूर्ण टीम हे कार्य पूर्ण करण्यास सज्ज आहोत. कोरोनाचं संकट जरी मोठं असलं तरी माझ्या मतदारसंघातील, ठाण्यातील एकही नागरिक उपाशी झोपणार नाही, याची आम्ही पूरेपूर काळजी घेणार आहोत, असे सांगून "संकट गंभीर आहे,पण राज्य सरकार खंबीर आहे.तुम्ही देखील सर्वांनी मिळून स्थानिक प्रशासनाला सहकार्य करा आणि कृपया आपल्या घरातच रहा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले.