ठाणे: मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटातील आमदारांना डीवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुंब्रा मधील काही नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असतांनाच जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा मधील गद्दार फॅमिली गेल्याने मला काहीही फरक पडत नसल्याचे म्हंटले होते. कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी अनोखा केक कापत त्यांना टोला लगावला आहे.
नक्की कोणावर निशाणा? आता हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंब्रा येथील स्थानिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो केक कापण्यात आला. त्यावर गद्दार फॅमिली, 50 खोके एकदम ओके, खोके बोके..माजलेत बोके अशा आशयाचे मेसेज लिहिलेले होता. विशेष म्हणजे वाढदिवस जरी कार्यकर्त्याचा असला तरी केक मात्र आव्हाडांनी कापला आणि त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही वाढदिवस असल्याने यातून ते नक्की कोणावर निशाणा साधतायत याबद्दल ठाण्यात चर्चा होताना दिसत आहे.
अनेक नगरसेवक फुटणार: राष्ट्रवादीतील काही नगरसेवक फुटण्याच्या मार्गावर असल्यामुळे याची कुन कून लागली. हे नगरसेवक पैशाच्या आमिषाला बळी पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाणार असल्याचे चित्र आता ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. यामुळेच जितेंद्र आव्हाडांनी हा टोला लगावणारा केक कापून अप्रत्यक्षरीत्या गद्दारांना उपदेशून डिवचले आहे. तर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक आणि कार्यकर्ते फुटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अजित पवार यांनी स्वतः याची दखल घेत सर्व नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीला देखील तेरा नगरसेवक अनुपस्थित होते.
अनेक दिवसांपासून नजीब मुल्ला यांना फुस: राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि माझी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांना मागील काही दिवसांपासून शिंदे गटांकडून पक्षप्रवेश करण्यासाठी फुस लावण्यात येत आहे. मात्र तरी देखील आपण पक्ष सोडणार नसल्याचे नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांना भेटून सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्स वर शिंदे गटाच्या शुभेच्छाकांची नावे पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर या आधीही 50 खोके एकदम ओके ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची डोकेदुखी झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून शिंदे गटाच्या आमदारांवर व मंत्र्यांवर पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला होता. असे आरोप करणाऱ्या नेत्यांविरोधात कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा एकनाथ शिंदे गटाकडून देण्यात आला होता.