ठाणे - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुरला उमेदवारी देणे म्हणजे शहिदांचा अपमान आहे. तिच्यासकट भाजप सरकारला धडा शिकवा, असे आवाहन करण्यासाठी आज ठाण्यात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रज्ञा ठाकुरच्या वक्तव्याचे समर्थन म्हणजे कसाबने केलेल्या कृत्याचे समर्थन केल्यासारखेच असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना, तुझा सर्वनाश होईल, असा शाप साध्वी यांनी दिला होता. म्हणून, त्यांचा २६/११ च्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वादग्रस्त विधान प्रज्ञा ठाकूर यांनी केले होते. त्याचा खरपूस समाचार आव्हाड यांनी घेतला. हिंदू हा सहिष्णू असून, मराठी माणसाने या देशासाठी नेहमीच मोठा त्याग केला असल्याचे त्यांनी सांगितले. करकरे, साळसकर, कामठे, ओंबळे हे सर्व आमचे आदर्श असून, प्रज्ञा ठाकूरने त्यांचा अपमान केल्याने जनता त्यांना चांगलाच धडा शिकवेल असे भाकीत आव्हाड यांनी वर्तवले. घातक विधान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी म्हणजे अजमल कसाबच्या कृत्याचे समर्थन असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. ठाण्यातील पाचपाखाडी भागातील शहीद जनरल अरुणकुमार वैद्य चौकात मोठ्या प्रमाणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.