ठाणे - येथील शहापूर-किन्हवली मार्गावर रिक्षा आणि बोलेरो जीपमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात रिक्षातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. कचरुबाई कमळू डोंगरे (वय ७५)असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा- उन्हाळ्यातील सुट्टीसाठी 'येथे' जाणार बिग बी आणि जया बच्चन
साक्षी दिपक पवार (वय १३), दिपक रामदास पवार (वय ४७), कमळू जीपा डोंगरे (वय ७५) सर्व राहणार शहापूर, आणि विलास बबन गोरे, (वय ५८), नाथा डोंगरे (वय ५० रा. वाफेपाडा) असे ६ जण गंभीर जखमी असून त्यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. या सर्व जखमींना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शहापूर-किन्हवली मार्गावरील शिल्लोतर गावानजिक आज दुपारच्या सुमाराला रिक्षा आणि बोलेरो जीप भरधाव वेगाने जात होत्या. त्याच सुमाराला जीप व रिक्षामध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि, रिक्षाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. तर जीपच्या पुढील भागाचेही नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच किन्हवली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंंतर मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताचा अधिक तपास किन्हवली पोलीस करत आहेत.