ठाणे - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोव्हिड-19 ची चाचणी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत घरच्या घरी स्वतःला विलगीकरण करून ठेवण्याबाबतचे किंवा महापालिकेच्या विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्यास त्या व्यक्तीपासून सामान्य व्यक्तीला कोव्हिड 19 चा संसर्ग होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात आयसीएमआरने प्राधिकृत केलेल्या खासगी चाचणी केंद्रांच्या माध्यमातून कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रावर तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो. जर त्या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला तर या कालावधीत त्याच्यापासून अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
संबंधित बाब लक्षात घेऊन एखाद्या व्यक्तीने कोव्हिड 19 साठी तपासणी केल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक राहणार आहे. सदर व्यक्ती घरच्याघरी स्वतःला विलगीकरण करून ठेवण्याबाबत किंवा महापालिकेच्या विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र त्याने चाचणीच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे. कोरोनाची बाधा इतरांना होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.