ठाणे- रुग्णवाहिका नसल्याने रेल्वे अपघातात दोन्ही पाय जायबंदी झालेल्या प्रवाशाला मुंब्रा स्थानकातून लोकलने ठाण्याला आणण्यात आले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी घडली होती. जखमी व्यक्तीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्या प्रवाशाला मुंबईला हलवण्यात आले. या घटनेमुळे मुंब्रा रेल्वे स्थानकात रुग्णवाहिकेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुंब्र्यातील फलाट क्रमांक २ येथून मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्याच्या खटाटोपात अचानक तोल जाऊन एक प्रवाशी थेट फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये पडला. पायावरून लोकल गेल्याने त्याला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. घटनास्थळी पोहोचलेल्या आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी जखमी अवस्थेत त्या प्रवाशाला स्थानकाबाहेरील वनरुपी क्लिनिकजवळ आणून रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केला. परंतु, तब्बल २५ ते ३० मिनिटे कॉल करून देखील रुग्णवाहिका मिळू शकली नसल्याने अखेर कल्याणकडून आलेल्या धीम्या लोकलने जखमी व्यक्तीला ठाणे स्थानकात आणून सिव्हिल रुग्णलयात पाठवण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्या प्रवाश्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सदर व्यक्तीकडे एक बॅग सापडली असून त्यात कोणतेही ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख पटलेली नाही.
हेही वाचा- मुंबई- नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत पादचारी ठार