ठाणे - चिमणी हा लहान आणि सर्वांच्याच आवडीचा सुंदर पक्षी आहे. लहानपणी आपल्याला तिची ओळख 'चिऊताई' या नावाने होत असे. काही वर्षांपूर्वी प्रत्येक घराची सकाळ ही चिमण्यांच्या चिवचिवाटाने व्हायची. मात्र, आता शहरातील घरांच्या खिडकीतून बाहेर डोकावले तर कबुतर, कावळे या पक्षांच्या थव्यांमध्ये एखाद दुसरी चिमणी आपल्या नजरेस पडते. हीच बाब लक्षात घेऊन ठाण्यातील स्पॅरो ताई फाउंडेशनने ( Sparrow Tai Foundation ) विविध उपक्रमाच्या माध्यामातून चिमण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहे.
शहरातील वाढत्या आधुनिकीकरणामुळे चिमण्यांसारख्या लहान पक्षांना आपली घरटी बांधण्यासाठी तसेच चारा, पाण्यासाठी पुरेसे वातावरण निर्माण होत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शहरी भागात चिमण्यांची संख्या नगण्य होत आहे. तेव्हा शहरी भागातील चिमण्यांची घटणारी संख्या लक्षात घेऊन डॉ. ज्योती परब आणि डॉ. राज परब या दाम्पत्याने स्पॅरो ताई फाउंडेशनची सुरुवात केली.
या फाऊंडेशच्या माध्यमातून पक्षांच्या संगोपनासाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची कमिटी स्थापन करण्यात आली. त्यांना शाळेच्या आवारात येणाऱ्या पक्षांच्या देखभालीविषयी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, चिमण्यांची संख्या वाढवायची असेल तर शहरी भागात त्यांना पुरेसा चारापाणी आणि निवारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचसोबत, स्पॅरो ताई फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, अशी घरटी तयार करण्याचे प्रशिक्षणही नागरिकांना दिले गेले.
चिमणीच्या संवर्धनासाठी कार्यक्रम
स्पॅरो ताई फाउंडेशनच्या फेसबुक पेजद्वारे चिमणी या पक्षाची कशी काळजी घ्यावी, त्यांना कसे हाताळावे अशी माहिती दिली जाते. तर, कोरोना काळात घरातील उपलब्ध वस्तूंपासून चिमणीची घरटी आणि फिडर बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याला महाराष्ट्रातून नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता, आज जागतिक चिमणी दिनानिमित्त टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, अशी घरटी तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे साक्षी परब यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा दौरा करणार, भाजपाचे हिंदुत्व केवळ राजकारणासाठी - मुख्यमंत्री ठाकरे