नवी मुंबई - नौसेना आयुध भंडार करंजाच्या हिरक महोत्सव प्रसंगी भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल कव्हरचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज सभागृह एनएडी करंजा येथे करण्यात आले.
हेही वाचा - पहेले मंदिर फिर सरकार; उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील - खासदार राहुल शेवाळे
नौसेना आयुध भंडार हे भारतीय नौदलास अद्ययावत शस्त्रसामग्रीचा पुरवठा करते. भारताच्या सागरी संरक्षणात या संस्थेचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. नौसेना आयुध भंडार, करंजाची स्थापना १९५९ या साली झाली होती. यावर्षी स्थापनेला साठ वर्ष पूर्ण होत असून नौसेना आयुध भंडार, करंजा आपला हिरक महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी नौसेना आयुध भंडार, करंजावर आधारीत विशेष टपाल कव्हरचे अनावरण नवी मुंबई पोस्टल रिजनच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाले, भारतीय नौदलाचे वाईस अँडमिरल अजीत कुमार आणि भारतीय नौदलाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱयांच्या हातून पार पडले. या प्रसंगी बोलताना शोभा मधाले यांनी सांगीतले की, भारतीय डाक विभागामार्फत शासकीय संस्थांच्या तसेच खासगी संस्थांच्या विशेष प्रसंगी अशा टपाल कव्हरचे अनावरण करण्यात येते. या विशेष टपाल कव्हरचे तिकीट संग्रहामध्ये अनान्यसाधारण महत्व असते. जगभरातील तिकीट संग्रहकांकडून अशा विशेष कव्हरला मागणी असते. आजच्या स्पर्धेच्या युगात भारतीय डाक विभागाचे आधुनिकीकरण करण्यात येत असून विभाग आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. याप्रसंगी त्यांनी डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थीतांना दिली. नवी मुंबई डाक विभागामार्फत 'विशेष डाक तिकीटांचे प्रदर्शन या प्रसंगी ठेवण्यात आले होते. तसेच टपाल तिकीटे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.