ठाणे - चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील बहुतांश सखल भाग जलमय झाला. तर दुसरीकडे जंगल, शेत, मोकळ्या परिसरातील असलेल्या सापांच्या बिळात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने बिळातील सापांनी मानवी वस्तीत आश्रय घेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना पुन्हा कल्याण पश्चिम परिसरातील सापर्डे गावातील घडली आहे.
सापर्डे गावात वामन थळे हे कुटुंबासह राहतात. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या झोपडीत पावसाचे पाणी शिरल्याने त्यांनी दुसरीकडे आसरा घेतला होता. आज दुपारपासून या परिसरात पाणी ओसरू लागल्याने वामन थळे हे दुपारच्या सुमाराला झोपडीत कुटुंबासह साफसफाईसाठी आले होते. त्यावेळी अचानक त्यांना भिंती वरील एका कोपर्यात नाग दिसला.
दरम्यान, झोपडीत साप शिरल्याची माहिती 'वार' संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागाला झोपडी मधून शिताफीने पकडले. त्यांनंतर थळे कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा नाग इंडियन कोब्रा (भारतीय नाग) जातीचा असून साडेपाच फूट लांबीचा असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. नागाला वन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जंगलात सोडण्यात येणार असल्याचेही सांगितले.