ठाणे - कोरोनाच्या काळात फुफ्फुसाचा व दम्याचा त्रास होणाऱ्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी लागते. त्यातच आता ठाण्यातील हवेत धुळीचे कण वाढल्याचा अहवाल ठाणे पालिकेने दिला आहे. तर कोरोनाच्या महामारीत अॅलर्जी, दम्याचे आजारही बळावले आहेत. त्यामुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे. मार्च आणि मे महिन्यात केलेल्या पाहणीत सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण मर्यादेपेक्षा सुमारे २० ते ३० टक्के अधिक आढळून आले. मात्र धुळीकणाची पातळी १०० पेक्षापुढे १२९ पर्यंत गेल्याचे दिसले.
हवेत मर्यादेपेक्षा जास्त धुळीचे कण आढळले -
ठाण्यात आज घडीला १९ लाख ३० हजाराहून अधिक वाहने आहेत. पूर्वद्रूतगती मार्गामुळे शहरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याशिवाय शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. तसेच विविध बांधकामांमुळे हवेत धुळीचे कण वाढल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. टाळेबंदीच्या काळात ठाण्यातील प्रदुषणाची पातळी खालावली असल्याचे सुखद वातावरण होते. मात्र दुसरीकडे शहराची हवा ही धुळीने माखल्याचे समोर आले आहे. ठाण्याच्या हवेत मर्यादेपेक्षा जास्त धुळीचे कण आढळले आहेत. त्यामुळे ऐन कोरोनाच्या महामारीत अॅलजी, दम्याचे आजारही बळवले आहेत. खाडी किनाऱ्याची झालर असलेल्या आणि मुंबईला अगदी खेटून वसलेल्या ठाणे शहरातील प्रदूषणाचा मुद्दा नेहमीच समोर येत असतो. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कडकडीत टाळेबंदीत शहरातील प्रदूषणाची पातळी कमालीची घटल्याचे निदर्शनास आले होते.
सर्दी, अॅलर्जी किवा दमाने प्रमाण वाढले -
यंदा हवेतील सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड मानांकनापेक्षा कमी आढळले आहे. मात्र धुळीकणांनी आपली पातळी ओलांडली आहे. ही समस्या गेल्या अनेकवर्षांपासून असली, तरी त्याचे दुष्परिणाम आता ठाणेकरांना सहन करावे लागत असल्याचेही समोर आले आहे. ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात प्रत्येक १०० रुग्णांमध्ये १० ते २० रुग्ण हे सर्दी, अॅलर्जी किवा दम्याने संक्रमीत असल्याची माहिती येथील फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर धुळीचे कण फुफ्फुसांमध्ये रुतून भविष्यात फुफ्फुसांत गाठ होण्याची शक्यताही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पावसाळा आणि हिवाळा पोषक -
धुळीकणांचा सर्वाधिक धोका हा पावसाळा आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला असतो. याकाळात रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. अशावेळी अॅलर्जीचा त्रास असणारे जर धुळीच्या संपर्कात आले, तर त्यांची प्रकृती बिघडू शकते. हे धुळीकण इतके घातक असतात की, सतत त्याच्या संपर्कात आल्यास फुफ्फुसात खोलवर जाऊन बसतात. आणि कालांतराने त्याची गाठ होऊन गंभीर परिणामाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही त्यांनी सांगितले.
हे आहेत अधिक धुळीचे स्पॉट -
शहरातील ठाणे स्थानक, तीनहात नाका, जांभळीनाका यासह चौक हे सर्वाधिक धुळीकणाचे अड्डे मानले जात आहेत. येथील धुळीची समस्या सोडवण्यासाठी पाच वर्षांपूर्वी ठिकठिकाणी धूळ नियंत्रण यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र तीन वर्षांतच ती कुचकामी ठरल्याने हा प्रयोग फसला असल्याचे समोर आले आहे.