ठाणे - गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना उल्हासनगर येथे घडली आहे. कॅम्प तीन परिसरात एका हॉटेलसमोरून एका महागड्या स्पोर्ट्स सायकलची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या सायकल चोरीची घटना सीसीटीव्ही कैद झाली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अज्ञात सायकल चोरट्याचा तपास सुरु केला आहे.
मुलाच्या वाढदिवशी खरेदी केली होती स्पोर्ट्स सायकल -
उल्हासनगरमधील कॅम्प तीन परिसरात दिलीप अच्छारा यांचे हॉटेल आहे. त्यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला एक स्पोर्ट्स सायकल खरेदी करून ती सायकल हॉटेलच्या बाहेर उभी केली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी इतरही दुचाक्या उभ्या होत्या. मात्र, चोरट्याने स्पोर्ट्स सायकलच लंपास केली. या सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
नागरिकांचा सायकल खरेदीकडे कल -
कोरोना काळात फिटनेसचे महत्त्व सगळ्यानाच समजू लागले आहे. नागरिकांनी चालण्याफिरण्यासह सायकल चालवण्यावरही भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून नागरिकांचा सायकल खरेदीकडे कल वाढला असल्याचे दिसून येते. मात्र, दुचाकीसह आता चोरट्यांनी महागड्या सायकलींकडे आपला मोर्चा वळवला असून गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - चहा पिल्यानंतर कप सुद्धा खा..! कोल्हापुरातील तरुणांनी बनवले 'बिस्कीट कप'