ठाणे - ३०० रुपये रोजंदारीवर कुटुंबाच्या पोटाची खळगी भरणाऱ्या मजुराला आयकर विभागाने तब्बल १ कोटी पाच लाख रुपये भरणा करण्याची नोटीस बजावल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. भाऊसाहेब अहिरे असे नोटीस बजावलेल्या मजुराचे नाव असून ते कुटुंबासह आंबिवली परिसरात राहतात. भाऊसाहेब अहिरे यांच्या नावे नोटबंदीच्या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या फसवणुकीच्या प्रकाराने सर्वच थक्क झाले होते. तर, प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरल्याने आयकर विभागासह खडबडून जागे झालेल्या ठाणे ग्रामीण पोलीस यंत्रणेने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा - सेंट जाॅर्ज रूग्णालय ठरले स्वच्छतेच्या बाबतीत 'अव्वल'
कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली गावातील धम्मदीप नगर, गाळेगाव येथे झोपडपट्टीत राहणारे भाऊसाहेब अहिरे हे मजुरीचे काम करतात. त्यांना आयकर विभागाने तब्बल एक कोटी पाच लाख रुपये भरणा करण्यासाठी नोटीस बजावल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अहिरे यांच्या बँक खात्यात 5 सप्टेंबर 2019 ला नोटबंदीच्या कालावधीत दोनवेळा एकूण 58 लाख रुपये जमा झाले होते. त्यावर आयकर विभागाने विवरण मागितले होते. सुरुवातीला भाऊसाहेब यांनी दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा 12 डिसेंबरला आयकर विभागाकडून नोटीस आली.
दरम्यान, महिना कसेबसे सात-आठ हजार कमवणाऱ्या भाऊसाहेब यांनी स्थानिक कार्यकर्ते, नगरसेवक यांच्यासह आयकर विभागाच्या नोटीसची शाहनिशा सुरू केली. संबंधीत बँकेतील कल्याण शाखेत चौकशी केली असता, मुंबई येथील शाखेत त्यांच्या बनावट मतदान कार्ड, पॅनकार्डचा वापर करत जीबी इन्टरप्राइजेस माध्यमातून एक्सपोर्ट इनपोर्टचा व्यवसाय असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. तसेच भाऊसाहेब अहिरे यांच्या नावाने अकाऊंट काढून बँकेत व्यवहार करत फसवणूक केली असल्याचे भाऊसाहेब अहिरे यांनी सांगितले.
माझे मतदान कार्ड, पॅनकार्डच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्या कागदपत्रात दुसऱ्याचा फोटो व सहीचा वापर करत अकाऊंट काढून व्यवहार केला असल्याचे अहिरे यांनी सांगितले. त्यानंतर अहिरे यांनी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना तक्रारअर्ज देत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - 'इतिहास वाचून वर्तमानातील आव्हाने स्वीकारा'
दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कार्यवाही सुरू करत कल्याण तालुका पोलिसांकडे तपास वर्ग केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता, तपासअर्ज आमच्याकडे वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणी तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल केलेला नसल्याचे त्यांनी सांगितलें. आयकर विभागानेही अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, बँक खाते कसे उघडले, खात्यात व्यवहार कोणी केले, कंपनी कशी स्थापन झाली, बँक खाते बंद का करण्यात आले, या सर्व गोष्टीं तूर्तास तरी अनुत्तरित असून पोलीस तपासाअंती या प्रकरणाचा तिढा सुटणार आहे.