नवी मुंबई - सत्ताधारी नेहमीच सत्तेचा गैरवापर करत असतात, मात्र हा राजकारणाचा पॅटर्न बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे, असे वक्तव्य मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. ते नवी मुंबईत मनसेच्या तीन शाखांचे उद्घाटन झाले त्याप्रसंगी बोलत होते. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे आणि मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची देखील उपस्थिती होती.
राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे सरकारचं घाणेरडं राजकारण
राज ठाकरे यांची सिक्युरिटी काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण आहे, राज ठाकरेंना कोणत्याही सुरक्षेची गरज नाही त्यांच्यासाठी मनसैनिक खंबीर आहेत, असेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी म्हंटले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपापासून सत्तेत आलेलं सरकार विरोधकांचे नगरसेवक पळवत आलेत हा ट्रेंड झाला आहे, जो सत्तेत असतो तो त्याचा गैरवापर करत असतो, मात्र जे या पक्षातून त्या पक्षात अशा बेडूक उड्या मारतात त्यांना घरी बसवलं पाहिजे, त्याशिवाय हे थांबणार नाही असेही राजू पाटील यांनी म्हटले आहे.
मनसे नवी मुंबईतील सर्व जागा लढवणार
नवी मुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अद्याप युतीचा प्रस्ताव आलेला नाही, प्रस्ताव आल्यास युती संदर्भातला निर्णय राज ठाकरे घेतील, असेही राजू पाटील यांनी म्हटले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही सर्व जागा लढण्याची तयारी केली असून, त्याप्रमाणे कामाला देखील लागलो आहोत असेही ते यावेळी म्हणाले.