ठाणे: वाहतूक कोंडीच्या घुसमटीत अडकलेले ठाणे आणि डोंबिवली यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत मुंब्रा वाय जंक्शन पूल आणि कळवा क्रिक उड्डाणपूलचे निर्माण करण्यात आले आहे. पूल पूर्णही झाले. पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना उदघाटनासाठी पत्र पाठवले असून त्यांचा वेळ मागितला आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स न आल्याने हे दोन्ही प्रकल्प उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे ठाणेकरांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये नाराजगीचे सूर आहेत.
२०१० रोजी हालचाली सुरु: कळवा परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करणार्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाची एक लेन आता महिनाभरानंतर खुली होणार आहे, असे प्रशासन सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनाच्या वेळेच्या प्रतीक्षेत हा पूल आहे. मुंबईतील सी लिंकच्या धर्तीवर हा पुल पालिकेने तयार करण्यासाठी २०१० रोजी हालचाली सुरु केल्या होते. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरवात होण्यासाठी २०१४ साल उजाडले. त्यावेळेस या पुलाच्या कामाचा खर्च १६९ कोटींचा अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु आता तो खर्च १८३ कोटींवर गेला आहे. कळवा पुलाच्या एका मार्गिकेची शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे महानगरपालिकेचे आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दौरा करून प्रशासनाला सांगितले आहे.
हे आहे कळवा पुलाचे वैशिष्ट: ठाणे ते कळव्याला जोडणाऱ्या कळवा नाक्यावर असलेल्या ब्रिटीश कालीन पहिला पूल १२४ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या पुलाच्या बाजूलाच पालिकेने दुसरा पुल १९९५ साली उभारला आहे. परंतु जुना पुल बंद करण्यात आल्याने दुसऱ्या पुलावर देखील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तिसऱ्या खाडी पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाचे काम हे २०१४ मध्ये सुरु करण्यात आले होते. यासाठी १८३ कोटी ६६ लाख ६१ हजार ३५३ रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यानुसार 3 वर्षात या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानुसार २०१७ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
ठाणे जिल्हा वाहतूक कोंडीचा झालाय भस्मासुर: ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीच्या परिस्थितीचा भस्मासुर झालेला आहे. या भस्मासुराला दूर करण्यासाठी मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपूल आणि कळवा क्रिक उड्डाणपूल तयार करण्यात आला. कोट्यवधींचा खर्च करून हे पूल तयार झालेले आहेत. मात्र वाहतुकीसाठी हे पूल अद्याप खुले करण्यात आलेले नाहीत. या पुलांना सुरु करण्यासाठी उड्डाणपूल हे मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. मुहूर्त सापडणार कधी ? उदघाटन करणार कधी असा प्रश्न आता सर्व सामान्य विचारात आहेत.