ठाणे - उल्हासनगर महापालिका हद्दीत धोकादायक इमारती कोसळण्याचे सत्र सुरूच असून उल्हासनगर 5 नंबर परिसरात गांधी रोडवर असलेल्या पारस अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावरील बेडरूमचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळून एकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. तर उल्हानसागर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून इमारत रिकामी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आकाश नरेशलाल पोपटानी (वय 24 वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना राबवली जात नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे.
इमारतीचे स्लॅब कोसळून दोन महिन्यात 14 पेक्षा जास्त जणांचा बळी
उल्हासनगर शहरात इमारती स्लॅब, गॅलरी पडण्याचे सत्र सुरू असून धोकादायक व जुन्या इमारतींमधील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. कॅम्प नं-5 येथील गांधी रोड परिसरात शनिवारी (दि. 23) रात्रीच्या साडे दहाच्या सुमारास पारस इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका बेडरूमचा अचानक चौथ्या मजल्यावर स्लॅब कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी पथकासह घटनस्थळी धाव घेऊन सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत रिकामी केली. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपूर्वी इमारतीचे स्लॅब पडून 14 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे.
वर्षभरापूर्वी धोकादायक म्हणून घोषित
वर्षभरापूर्वी धोकादायक म्हणून घोषित केलेल्या पारस पॅलेस या पाच मजली इमारतीतील पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भेट देत पाहणी केली. तसेच येथे जखमी झालेल्यांना उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याठिकाणी जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली.
10 वर्षात स्लॅब कोसळून 32 पेक्षा अधिक जणांचा बळी
उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात 1992 ते 95 दरम्यान रेतीवर म्हणजेच वाळूवर बंदी असताना दगडाचा बारीक चुरा व वालवा रेतीपासून असंख्य इमारती उभारण्यात आल्या. त्याच इमारती नागरिकांच्या जीवावर उठल्याचे उघड होत आहे. निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारतींचे स्लॅब कोसळून दरवर्षी अनेकांचा बळी जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून मागील 10 वर्षांत 34 इमारतींचे स्लॅब कोसळून 32 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. तर हजारो नागरिक बेघर झाले आहेत. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. इमारत कोसळली की राजकीय नेते, महापालिका व सरकार सहानुभूती दाखविते. त्यानंतर धोकादायक इमारतीबाबत काहीएक निर्णय घेतला जात नसल्याची टीका होत आहे.
धोकादायक इमारतींच्या यादीवरही प्रश्नचिन्ह
उल्हासनगर महापालिकेने एकूण 147 इमारती धोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले असून त्यापैकी 23 इमारती अतिधोकादायक आहेत. 23 पैकी 18 अतिधोकादायक इमारती रिकाम्या असून, अन्य इमारतींमधील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. धोकादायक इमारतींच्या यादीव्यतिरिक्त इतर इमारतींचे स्लॅब कोसळून नागरिकांचे बळी जात असल्याने, धोकादायक इमारतींच्या यादीवरही प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. अखेर महापालिकेने 10 वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेऊन इमारतींना नोटीस दिल्या आहेत. तर सरकारने खास शहरासाठी काढलेल्या अध्यादेशाअंतर्गत धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी होऊ शकते का.? याबाबतचा प्रश्न जैसे थे असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
दोन महिने उलटूनही अहवाल दिला नसल्याचे समोर
शहरातील धोकादायक व अनाधिकृत इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन करून, 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही समितीने अद्याप अहवाल दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे शासनाने शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी अवैध व जुन्या इमारतींबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे. पारस इमारत खाली केल्यानंतर, त्यामधील नागरिकांची महापालिकेने तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
शिवसेना आमदार म्हणतात लवकरच प्रश्न मार्गी लागणार
उल्हासनगर महानगरपालिकेने धोकादायक व अनधिकृत घोषित केलेल्या इमारतींमध्ये नागरिकांनी राहू नये, असे आवाहनही आमदार डॉ. किणीकर यांनी केले आहे. उल्हासनगर शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकही झाली होती. त्यानुसार समिती नेमण्यात आली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे ही आमदार डॉ. किणीकर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - CCTV FOOTAGE - कांदे बटाटे व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले