ठाणे - एमएमआर रिजनमध्ये कोरोना रुग्नांच्या सर्वाधिक संख्येत कल्याण डोंबिवली महापालिका चार महिन्यापूर्वी अव्वल स्थानी होती. मात्र, गेल्या १० दिवसांपासून शहरात कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वाहतूक पोलीस पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. आजपासून रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांमध्ये जर तीन प्रवासी प्रवास करताना आढळून आले तर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक विभागाचे एसीपी माने-पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे, तीन महिन्यांपासून रिक्षात तीन प्रवाशांच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे.
हेही वाचा - ठाण्यात कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरू
कल्याण डोंबिवलीत रुग्णांची संख्या ६९ हजार ५०६ च्या घरात
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी पुन्हा ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात सर्वच महापालिका, नगरपालिका कोरोना प्रसार रोखण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातला आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन आकडा ६९ हजार ५०६ पर्यत पोहचला आहे.
आज दिवसभरात १४५ रुग्ण आढळून आले, तर ९९७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, आज ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे, आतापर्यंत १ हजार १५५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. विशेषतः सुरवातीला महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनची नियमावली आखण्यात येऊन नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. असे असताना काही ठिकाणी मात्र नियमाला हरताळ फासून कल्याण रेल्वेस्थानकाबाहेर राजरोसपणे रिक्षा चालक चार प्रवासी रिक्षात कोंबून नेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे, कल्याण डोंबिवलीत कोरोना संसर्ग कसा आटोक्यात येईल, हा चिंतेचा विषय बनला आहे.
कोरोनाच्या थैमानातही चौथी सीट घेऊन रिक्षा सुसाट
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिला, व सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू केली आहे. त्यामुळे, घरापासून ते रेल्वेस्थानक, बसस्थानकापर्यंत कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा दिली. मात्र, काही रिक्षाचालक सामाजिक अंतरासह नियमांचे उलंघन करून कोरोनाच्या थैमानातही चौथी सीट घेऊन रिक्षा सुसाट पळवताना दिसत आहे. त्यामुळे, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा अंदाज लक्षात घेता, आजपासून रिक्षात दोन प्रवाशांना मुभा देण्यात आली असून, आज या विषयी वाहतूक पोलिसांच्या पथकाने कल्याण रेल्वे, बसस्थानक परिसरात रिक्षा चालकांना मास्कचे वाटप करून कोरोना काळातल्या वाहतुकीच्या नियमांचे पुन्हा पालन करण्यात यावे, असे सांगितले. तसेच, तिसरा प्रवाशी जर रिक्षात प्रवासादरम्यान आढळून आला, तर चालकावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
केडीएमसी व पोलिसांच्या आवाहनाला हरताळ
कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशातच रिक्षा चालक राजरोसपणे नियमांची पायमल्ली करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून तर रिक्षामध्ये चार-पाच प्रवाशी भरताना दिसत आहे. हे फारच धक्कादायक असल्याचे जागृत नागरिकांचे म्हणणे आहे. अनलॉक काळात रिक्षा वाहतूक सुरू असल्याने केडीएमसी व पोलिसांच्या आवाहनाला हरताळ फासला आहे. एकदंरीत पालिका प्रशासन, दुसऱ्या विभागाचे सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने नियम काटेकोरपणे पालन होण्यासाठी कठोर पाऊले उचलली पाहिजे, नाही तर कोरोना पुन्हा शहरात हाहाकार माजवणार असल्याचे दिसून येईल.
हेही वाचा - भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांना अटक