ठाणे - गरिबांचे राहणीमान उंचावे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकाराच्या वतीने कल्याण डोंबिवलीतील गरिबांसाठी बीएसयूपी आवास योजना २००७ साली मंजूर करण्यात आली. त्यांनतर २०१० ते २०१४ पर्यंत कल्याण पूर्वेतील कचोरे गावात दोन प्रकल्प राबवून या ठिकाणी १ हजार ८२ घरे असलेली इमारतींची वसाहत उभारण्यात आली. यातील निम्म्या घरांचे वाटप करण्यात आले. मात्र, उर्वरित घरे धूळ खात पडून आहेत. या घरांमधील साहित्य चोरीला गेल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या पाहणी दौऱ्यात उघडकीस आले आहे.
हेही वाचा - शहापूरच्या बेलवड परिसरात बिबट्याची दहशत; शेतकऱ्याची गाय केली फस्त
आयुक्तांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहे. या घटनेनंतर ५ वर्षापासून तयार असलेली घरे अद्याप लाभार्थ्यांना का मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
५ वर्षापासून धूळखात पडल्याने चोरीचे प्रकार..
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ५ ते ६ ठिकाणी बीएसयूपी प्रकल्पांतर्गत गरिबांना इमारतींमध्ये घरे तयार करण्यात आलेली आहेत. त्यातच कल्याण पूर्वेतील कचोरे नजीकच्या नवी गोविंदवाडी परिसरात बीएसयूपी इमारती ५ वर्षापासून उभारून धूळखात पडल्या आहेत. मात्र, या इमारतींपैकी काही इमारतीत नागरिक राहत असून काही इमारती रिकाम्या असल्याने याचाच फायदा घेत काही भुरटे चोरटे इमारतीतील खिडक्या, नळ, दरवाजे, इलेक्ट्रिकल साहित्य अशा वस्तूंची चोरी करीत आहेत.
स्थानिक नागरिकांनी काढला चोरीच्या घटनेचा व्हिडिओ..
रिकाम्या उभ्या असलेल्या बीएसयूपी इमारतींमधून आता पर्यंत लाखोंच्या विविध इमारतींमधील साहित्य चोरीला गेले असून स्थानिक नागरिकांनी या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ काढून केडीएमसी अधिकाऱ्यांना दिला आहे. आता या प्रकरणाची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
स्थानिक नगरसेविकेच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..
या चोरीच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून घडत असून याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका, तथा भाजप महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी यांनी दिली.
हेही वाचा - अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मनसे कार्यकर्त्याकडून मदत