ठाणे : काल दुपारी संपूर्ण भारतासाठी अभिमान वाटावा अशा चंद्रयान ३ ने आकाशात झेप घेतली. त्यामुळे ISRO सोबत चांद्रयान प्रकल्पासाठी साहित्य पुरवणाऱ्या अनेक भारतीय कंपन्याची छाती अभिमानाने रुंदावली आहे. या कंपन्यांमध्ये महत्वाचे योगदान देणारी कंपनी म्हणजे लार्सन अँड टूब्रो अर्थात L&T.
L&T कंपनीचे महत्वपूर्ण योगदान : लार्सन अँड टूब्रो कंपनी गेली पाच दशके ISRO सोबत जोडली आहे. कंपनीने चंद्रयान १, २, गगनयान, मंगळयान मोहिमेत देखील कंपनीने मोठी महत्वाची कामगिरी बजावली होती. चांद्रयान 3 या प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती कंपनीने मुंबई, कोइंबतूर या ठिकाणी असलेल्या प्लांटमध्ये केली आहे. चंद्रयान ३ मोहिमेसाठी लागणाऱ्या अनेक महत्वापूर्ण भागांची निर्मिती लार्सन अँड टूब्रो कंपनीच्या बेंगलुरू येथील आंतरिक्ष निर्मिती कारखान्यात झाली आहे.
ISRO सोबत सहकार्य : चंद्रयान ३ मोहिमेत लाँचिंग पासून अंतरीक्ष यानाच्या ट्रॅकिंग पर्यंत लागणाऱ्या सॉफ्टवेअरपर्यंत अनेक स्तरावर L&T कंपनीचे महत्वपूर्ण योगदान आहे. अंतरीक्ष यांनाच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बूस्टर पासून अनेक छोट्या मोठ्या भागांची निर्मिती, चाचणी कंपनीच्या मुंबईच्या पवई प्लॅन्टमध्ये झाली आहे. भविष्यात देखील अशाच प्रकारे ISRO सोबत सहकार्य करत देशाच्या अंतरिक्ष कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावू अशी ग्वाही L&T कंपनीकडून देण्यात आली आहे.
मोठ्या साहित्याची गरज : या प्रकलापासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री देण्याचे महत्त्वाचे काम अनेक भारतीय कंपन्यांनी केले आहे. मागील अनेक वर्षांचा अनुभव आल्याने यंदा मोठे बदल करून आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा अनेक भारतीय कंपन्यांनी केला आहे. कंपन्यांनी भारताला अभिमान वाटेल अशा या मोहिमेसाठी लागणारे साहित्य वेळेत आणि दर्जेदार दिल्याने या मोहिमेत कोणतीही अडचण आली नाही. या मोहिमेला लागणारे साहित्याची निर्मिती जेवढी महत्त्वाची आहे तेवढे महत्त्वाचे साहित्य सुखरूप पोहचवणे देखील आहे. यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळेच ही मोहीम यशस्वी पार पडली आहे.