ठाणे - अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहिम उल्हासनगर महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार एका मोठ्या हॉटेलसह १४ बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. या मोहिमेची गती सुरुच राहणार असे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी स्पष्ट केल्याने अनधिकृत बांधकाम धारकांची झोप उडाली आहे.
आयुक्त अच्युत हांगे, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाढीव बांधकामांना जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बेकायदा बांधकामांवर हातोडा पडला आहे.
या आदेशानुसार हिराघाट थारासिंग दरबार रोडवरील बेकायदा बांधकामे तसेच धोबीघाट मधील ३ बांधकामे, महादेव कंपाउंड येथील मोठे शेड, तेजुमल चक्की भागातील ३ दुकाने, आझादनगर मधील ३ दुकाने, २ बॅरेकवरील अनधिकृत बांधकामांसोबत निलम हॉटेलच्या मागे उभारण्यात येत असलेला प्रशस्त ढाबा जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती गणेश शिंपी यांनी दिली.
या मोहिमेत सहाय्यक आयुक्त अजित गोवारी, भगवान कुमावत, दत्तात्रय जाधव तसेच सर्व मुकादम सहभागी झाले होते. तर कारवाई वेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.