मीरा भाईंदर(ठाणे) - अनेकवेळा सूचना देऊन देखील गृहसंकुलातील नागरिक ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायटींना २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. भाईंदर पश्विम परिसरातील घनकचरा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे वर्गीकरण न झाल्यामुळे ठप्प झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून शहरातील प्रत्येक इमारतीबाहेर ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी सोसायटी बाहेर नोटीस लावल्या आहेत. सोसायट्यांनी सुका व ओला कचरा वर्गीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ नुसार घनकचरा निर्मात्याने कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून स्वतंत्र डब्यात देणे बंधनकारक आहे. ओला कचऱ्यात ज्यात स्वयंपाक घरातील कचरा, भाजीपाला, फळे, नारळाच्या कवट्या, फुले, बागेतील कचरा यांचा समावेश आहे. तर, सुका कचरा यात प्लास्टिक, लाकूड, धातूच्या वस्तू, बाटल्या, काच, रबर यांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही नागरिकांकडून घंटागाडीत मिश्र स्वरूपात कचरा देण्यात येत आहे. इमारती, व्यक्ती, सोसायटी, संस्था आदी आस्थापणांकडून निर्माण होणारा घनकचरा ओला व सुका अशा प्रकारे वर्गीकरण करून महापालिकेस न दिल्यास मनपा कचरा उचलणार नाही. तसेच सोसायटीला कचरा वेगवेगळ्या डब्यात साठवणूक न केल्यास पहिल्या वेळी २०० रुपये दंड, तर दुसऱ्या वेळेपासून ३०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.