ठाणे : येत्या काही दिवसांत ठाण्यात राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक नगरसेवक शिंदे गटाला मिळाले असून लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ काढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. याचं अनुषंगाने अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबई येथे बुधवारी तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या बैठकीला गैरहजर असणारे माजी गटनेते नजीब मुल्ला हे गुरुवारी ठाणे महापालिकेत आल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले. यावेळी मुल्ला यांना माध्यमांनी विचारपूस केली. यावेळी मी अजित पवार यांना विश्वासात घेऊनच माझ्या इतर कामांसाठी दिल्लीत गेल्याचे नजीब मुल्ला म्हणाले. तातडीने ही बैठक बोलाविल्याने तर काही नगरसेवक आजारी असल्याने काहींना बैठकीला येता आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नजीब मुल्ला कुठे जाणार आमचा काही संबंध नाही. नजीब मुल्ला आमचा मित्र आहे. आमदार व्हावा, ही आमची इच्छा असून आमदारकीचा परफेक्ट मटेरियल असल्याचे मी याआधी सांगितले आहे. मुल्ला कुठे जाणार नाही, असे जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे म्हणत आहेत. आनंद परांजपे हे देखील शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत. त्यामूळे त्यांनी आम्हाला शिकवू नये.
-- नरेश मस्के, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते
आव्हाडांचा खटाटोप : येत्या काही दिवसांत केंद्रीय यंत्रणेकडून अटक होण्याची भीती राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. आव्हाडांच्या या विधानावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समन्वयक नरेश मस्के यांनी आक्षेप घेतला असून सहानुभूती मिळवण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा हा सर्व खटाटोप चालू असल्याची टीका मस्के यांनी केली. आव्हाडांना अटक कशाला ? आणि का होणार आहे ? जितेंद्र आव्हाडांनी काही तरी केले असेल त्यांना चाहूल लागली आहे का ? असा सवाल मस्के यांनी उपस्थित करून आव्हाडांच्या या विधानाची खिल्ली उडविली आहे.
यामुळे आव्हाड अडचणीत : ठाण्याच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून आव्हाडांना अनेक प्रकरणे भोवली आहेत. त्यातच अनंत करमुसे मारहाण प्रकरण, हर हर महादेव चित्रपट बंद करून प्रेक्षकांना मारहाण त्यांनतर उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात महिलेचा केलेला विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवड अडचणीत सापडले आहेत. ही सर्व प्रकरणे आव्हाडांच्या अंगलट आली असून ठाणेकर नागरिकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आव्हाडाचे प्रयत्न सुरू असल्याचे टीका विरोधकांनी केली आहे.
आव्हाडांनी भीती कशाची ? मला काही दिवसांत अटक होणार असल्याचे भाकीत जितेंद्र आव्हाडांनी केल्याने याची चर्चा सुरू झाली. विरोधकंनीही देखील आव्हाडांना अचानक झाले तरी काय ? असा प्रश्न पडला आहे. आव्हाडांनी काही केले असेल तर ते बाहेर येण्याची भीती वाटत आहे का ? त्याने तसे स्पष्ट करावे असे यावेळी म्हस्के यांनी सांगीतले. आम्हाला चुकीच्या पद्धतीने कोणाला अटक करायची गरज नाही. याच्याशी आमचा काही संबंध नसून जितेंद्र आव्हाड हे ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे काम करतील तेव्हा आमच्या दृष्टीने ती जमेची बाजू असणार आहे.
हेही वाचा : Eco Friendly E Buses : ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार १२३ पर्यावरणपूरक ई- बसेस