ठाणे - लग्न पत्रिकेत माझ्या नातेवाईकांचे नाव का नाही छापले, यावरून वाद घालत पत्नीच्या पोटात चाकू भोसकून तिचा खून केला. तर आईच्या बचावासाठी धावलेल्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या पतीला बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली. मोहन गुरुनाथ महाजन (वय ५९) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर मनीषा मोहन महाजन (वय ४५) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून गौरवी (वय २४) असे चाकूने प्राणघातक हल्ला झालेल्या मुलीचे नाव आहे.
कल्याण पश्चीमेकडील ठाणकरपाडा येथे पद्मावती प्रसाद इमारतीमध्ये आरोपी मोहन महाजन याचा २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास त्याची पत्नी मनीषासोबत मुलीच्या लग्नपत्रिकेत माझ्या नातेवाईकांचे नाव का नाही छापले यावरून वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की, मोहनने अचानक चाकूने पत्नी मनिषावर सपासप वार करून तिचा खून केला. मनीषाला वाचवण्यासाठी गेलेली मुलगी गौरवी हिच्यावरदेखील चाकूने वार करून आरोपी पती फरार झाला होता. मोहनवर पत्नीच्या खुनाचा व मुलीवर प्राणघातक हल्ल्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आरोपी मोहन महाजन हा कल्याण जवळील वसारगाव येथे लपून बसला आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोलीस हवालदार मनीष राजगुरू, सचिन साळवी, नितीन भोसले, योगेश बुधकर, सुनील पाटील यांच्या पथकाने शिताफीने सापळा रचून १२ तासातच आरोपीला अटक केली आहे.
आरोपी मोहन महाजन हा रिक्षाचालक असून त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याच्या या व्यसनामुळे पत्नी मनीषा आणि मुलगी गौरवी गेल्या ८ वर्षांपासून वेगळे राहत होते. ८ मे रोजी गौरवीच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यासाठी मानिषाने मोहनला घरी बोलावले होते. मात्र, लग्नपत्रिकेमध्ये मोहनच्या एका नातेवाईकाचे नाव न छापल्यामुळे त्याने मनीषासोबत रात्री वाद घातला. आणि याच वादातून त्याने तिच्या पोटात चाकू भोसकून खून केला. मुलगी गौरवीवरही प्राणघातक हल्ला केला होता. उद्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.