ठाणे - हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची ५ लाख ८० हजार रुपयांची रोकड कन्सल्टिंग टेबलच्या ड्रॉव्हरमधून अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना भिवंडीमध्ये घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील कामतघर परिसरात असलेल्या निरामय हॉस्पिटलमध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या हॉस्पिटलमधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हेही वाचा - चंद्रपूर : लाखोंच्या दारू साठ्यावर चालवला रोड रोलर
कामतघर येथे शिवानंद को. ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये डॉ. नरेश म्हात्रे, डॉ. भूपेश चिकणे, डॉ. प्रसन्न म्हात्रे, डॉ. समीन शेख आदी चारजण भागीदारीत निरामय हॉस्पिटल चालवतात. या हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉय, नर्स तसेच अन्य पाच तज्ञ डॉक्टर असा सुमारे २४ जणांचा स्टाफ या हॉस्पिटलच्या आस्थापनेवर कार्यरत आहे. १० नोव्हेंबरला हॉस्पीटल कर्मचाऱ्यांचा मासिक पगार करायचा असल्याने डॉ. भूपेश चिकणे यांनी पगाराच्या रकमेचे लिफाफे तयार करून कन्सल्टिंग टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवले होते. मात्र, सफेद पॅण्ट, शर्ट परिधान केलेल्या २० वर्षीय अज्ञात चोरट्याने हॉस्पिटलच्या कन्सल्टिंग रूममध्ये शिरून टेबलच्या ड्रॉव्हरचे लॉक बनावट चावीने उघडून आतील पगाराच्या रकमेचे भरलेले कागदी लिफाफे लाल पिशवीत टाकून पळून गेला.
हेही वाचा - घडनावळीसाठी दिलेले 1 कोटी 42 लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार
ही घटना पगार वाटप करण्यासाठी ड्रॉव्हरमधून पैसे काढण्यासाठी डॉ. भूपेश चिकणे गेले असता त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या घटनेची पडताळणी केली असता अज्ञात चोरटा कन्सल्टिंग रूममधून पैसे असलेले लिफाफे लाल रंगाच्या पिशवीत टाकून निघून जात असताना दिसून येत असल्याने त्याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ए एस आय दिलीप दुधाडे करत आहे. याप्रकरणी आरोपी चोराला लवकरच गजाआड करू असा विश्वास नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे.