ठाणे - टिकटॉक व्हिडीओ तयार करत असताना जोरात हसल्याचा राग मनात धरून २ भावांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघेही जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मुंब्रा पोलिसांत ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
यामध्ये अब्दुल्ला अकबर सलकी आणि युसूफ अकबर सलकी अशी मारहाण झालेल्या भावांची नावे आहेत. या दोघांना आरोपी ओवेश, कैफ, मोहिश, अशरफ या चौघांनी मंगळवारी सायंकाळी लोखंडी रॉड, बांबू आणि धारदार चॉपरने मारहाण केली.
मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता युसूफ अकबर सलकी याचा भाऊ अब्दुल्ला व त्याचे 2 मित्र (रा. मुंब्रा) हे इमारतीखाली उभे होते. त्या दरम्यान दुसरीकडे या इमारतीजवळ काही अंतरावर आरोपी आवेश, कैफ, मोहिश आणि अशरफ हे टिकटॉक व्हिडीओ बनवत होते. त्यावेळी अब्दुल्ला आणि त्याचे मित्र जोरात हसले. ते आपल्यालाच हसत असल्याचा समज करून याचा राग मनात धरून आरोपींनी अब्दुल्ला याला बोलावून हसण्याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने आम्ही आपसात हसत होतो तुम्हाला हसलो नाही, असे सांगितले. मात्र, चौकडी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थिती नव्हती.
त्यांनी अब्दुल्ला याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा अब्दुल्लाने युसूफला आवाज दिल्याने तो खाली आला. त्यावेळी त्यांनी त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा ओवेसने त्याच्या जवळच्या धारदार चॉपरने अब्दुलावर वार केला. यामध्ये अब्दुल्ला गंभीर जखमी झाला. यामध्ये अब्दुल्ला जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार उपचार सुरू आहेत.