मीरा भाईंदर (ठाणे) - मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मीरा भाईंदरला चांगलेच झोडपून काढले आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. भाईंदर पूर्व भागातील केबिन रोड, नवघर, बीपी रोड याठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
काशीमीरा परिसरातील पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्यामुळे काही काळ पेट्रोल पंप बंद करण्यात आले. तर, नीलकमल नाक्यापासून किनारा हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी सचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली, वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. मीरारोडमधील सिल्व्हर सरिता या परिसरात तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामध्ये घरातील फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. याच परिसरात गेल्या वर्षी ५ ते ६ फूट पाणी साचले होते. परंतु, प्रशासनाकडून १०० टक्के नालेसफाई न झाल्यामुळे हा नाहक त्रास करदात्यांना भोगावा लागत आहे. परिसरातील अनेक वाहनांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
मीरारोड मधील जागींड परिसर, शीतल नगर, शांती नगर, सृष्टी, साई बाबा नगर, मेरी गोल्ड, काशी गाव याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तर काही ठिकाणी झाडेही पडली आहेत. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे मुसळधार पावसामुळे नागरिकांनी कामाशिवाय घरा बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.