ठाणे - 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ५० लाख रुपये देतो त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी,' अशी संतप्त प्रतिक्रिया हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे काकांनी उल्हासनगरमध्ये दिली आहे. योगी सरकारने पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर केली, या आश्वासनावर आमचा विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.
उल्हासनगर शहरात राहाणारे पीडितेचे मोठे काका, चुलत भाऊ यांनी अखिल भारतीय नवयुवक वाल्मिकी संघाच्या वतीने आज उल्हासनगर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. आमच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केली, तिला अग्नी देण्याचा अधिकार पण पोलिसांनी हिरावून घेतला, त्या पोलिसांना आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, शिवाय हे दुष्कर्म करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, अशीही मागणी केली गेली.
मागण्यांचे निवेदन उल्हासनगर तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेश पोलिस मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पीडितेचे काका गेल्या ३५ वर्षांपासून आपल्या परिवारासह उल्हासनगरच्या वाल्मिकीनगर भागात राहतात. हाथरसला जाण्यासाठी तिकीट न मिळाल्याने ते गावी जाऊ शकले नाहीत.