ठाणे - पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच आपल्या कामाच्या व्यापात व्यस्त आणि तणावात असतात त्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. किंबहुना मनात असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेकदा पोलीस अधिकारी कर्मचारी नेहमीच तणावात राहून आपला आनंद हरवून बसतात. यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून कल्याण पश्चिमेकडील वादवा स्पोर्ट्स क्लब मध्ये आनंदाने कसे जगावे आणि आनंदाची दृष्टी कशी असावी, याकरिता हॅपिनेस गुरु अविनाश आनंद यांची मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेच्या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार प्रकाश लोंढे यशवंत चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यशाळेत हॅपिनेस गुरु अविनाश आनंद यांनी विविध खेळ आणि उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संवाद साधत त्यांना आनंदित राहण्याच्या टिप्स दिल्या. यावेळी आमदार आनंद यांनी आनंद मिळविण्यासाठी आपल्या मनावर ताबा ठेवणे तसेच लोकांसोबत आपल्या वागण्यावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यातूनच आनंद मिळेल, असे सांगितले. तर दत्तात्रय कराळे यांनी आपल्या कुटुंबासह एकत्रित दोन-तीन तास राहणे आणि एकत्रित आनंदमय वातावरण कसे ठेवावे, मग ते घरात असो वा कामाच्या ठिकाणी, या समजून घेण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. आपण आपल्या आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत आनंद कसा मिळवायचा याच्या काही टिप्स देण्याचा प्रयत्नही या कार्यक्रमात करण्यात आला. खात्री आहे, की या टिप्सचा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कौटुंबीक आयुष्यात निश्चितच सकारात्मक फायदा होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.