ठाणे : अंबरनाथ पूर्व भागात एका रिक्षाने प्रवास करताना विसरलेली ( goldchain forgotten along with handpurse ) ९ तोळे वजनाची ४ लाख ५० हजार रुपयाची सोन्याची गंठण, तांत्रिक तपास करत रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्याकडून गंठणसह पर्स ताब्यात घेऊन ते मुलीच्या स्वाधीन केले. आईचे गंठण मुलीच्या हातात पडताच तिच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला.
हॅण्ड पर्ससह गंठण विसरले रिक्षात : तक्रारदार आस्था नीतीन निकम, वय १६ ही भटवाडी, घाटकोपर पश्चिम मुंबई परिसरात राहते. तिच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने तिच्या आईचे ९ तोळयाचे सोन्याचे गंठण अंबरनाथ मध्ये राहणारे तिचे मामा संदिप नाथा मोरे यांच्याकडे ठेवण्यास दिले होते. त्यातच २४ ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपुजन असल्याने त्या दिवशी गंठण पुजेसाठी घेवुन जाण्यासाठी आस्था ही मामाकडे गंठण घेण्यासाठी आली होती. त्यानंतर घाटकोपरला घरी जाण्यासाठी मामाच्या घरुन गंठण घेवुन अंबरनाथ पूर्वेकडील वडवली सेक्शन येथे मैत्रीणीला भेटली. त्यानंतर सोन्याचे गंठण हॅण्डपर्समध्ये ठेवून रिक्षाने अंबरनाथ स्टेशनला जात होती. मात्र वडवली मार्केट ते बी कॅबीन रोड दरम्यान रिक्षात प्रवास करताना हॅण्ड पर्ससह ती रिक्षात विसरुन गेली होती.
रिक्षा क्रमांकाचा शोध पोलीस पथकाला लागला : याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दागिनेसह पर्स गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सोन्याचे गंठणचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. सौंदाणे, पादीर, पोना काठे व गोसावी यांचे पथक शोध घेत होते. शोध घेत असतानाच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षा क्रमांकाचा शोध पोलीस पथकाला लागला होता. त्यानंतर रिक्षा क्र एम.एच. ०५ सी.जी. ४५४२ चे रिक्षाचालक रमेश लक्ष्मण लदगे, हा सिध्दीविनायक नगर, अंबरनाथ पूर्वेत राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथक रिक्षाचालकाच्या घरी जावुन रिक्षात ठेवलेले सोन्याचे गंठण प्राप्त करून तक्रारदार आस्था निकम हिच्या स्वाधीन केले. त्यामुळे आस्था निकम हिने पोलिसांचे आभार मानले.