ठाणे- देशात सध्या कांद्याच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याने त्यांचा मोठा वांदा झाला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव १०० रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक आहेत. अशामध्येच उल्हासनगरमधील एका दुकानदाराने हँडलूम खरेदीसोबत एक किलो कांदे मोफत देण्याची ऑफर देऊन धमाल उडवून दिली आहे.
देशभरात कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधील शीतल हँडलूमच्या दुकान मालकाने एक वेगळी ऑफर देऊ केली आहे. १ हजार रुपयांची हँडलूम खरेदी केल्यावर एक किलो कांदे अगदी मोफत मिळवा, अशी ऑफर या दुकानदाराने दिली आहे. आम्हाला लोकांसाठी काहीतरी करायचे होते. कांद्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही विचार केला की, हँडलूम खरेदीसोबत कांदे मोफत देऊ, असे दुकानमालक ललित शिवकानी यांनी म्हटले आहे.
सद्या कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. कुठे कांद्याने शंभरी पार केली आहे. तर कुठे डबल सेंच्युरी मारत कांद्याने थेट २०० चा आकडा गाठला आहे. त्यामुळे अशा अनोख्या ऑफर समोर आल्या तर आश्चर्य वाटायला नको. दरम्यान, शीतल हँडलूम या दुकानाचा मालक हँडलूम खरेदीवर एक किलो कांदे मोफत देत असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच ग्राहकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात हँडलूम खरेदीला पसंती दिली आहे.
हेही वाचा- महावितरणचा अजब कारभार! कुत्र्यामुळे वीज मीटरचे रिडींग न घेतल्याचे सांगत ग्राहकांनाच ठरवले जबाबदार