ठाणे - गटाराच्या कठड्यावर गिटार वाजविण्याच्या धुंदीत एका तरुणाचा तोल जाऊन तो मोठ्या गटारात जाऊन पडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील लोकग्राम परिसरात घडली.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्यावर पोहोचली आहे. ७०च्या जवळपास कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण कल्याण पूर्वेत असल्याने या परिसरात बहुतांश परिसर आजही सील आहेत. त्यामुळे या भागात व्यवसायासह अनेक व्यवहार ठप्प असल्याने नागरिक घरातच आहेत. अशातच पावसाळा सुरू झाला आहे.
पावसासोबत संगीताचा आनंद घेण्यासाठी तरुण बुधवारी दुपारच्या सुमाराला गिटार वाजविण्यासाठी लोकग्राम परिसरातील भल्यामोठ्या गटाराच्या कठड्यावर बसून गिटार वाजवत होता. त्याला गिटार वाजविताना परिसरातील नागरिकही पाहत होते. मात्र, गिटार वाजवता वाजवता तोल जाऊन तो खोल गटारात पडला. हा तरुण (वय - 35) लोकग्राम परिसरात राहतो.
दरम्यान, तरुण बराच वेळेपासून गटारात पडला आहे, अशी माहिती कल्याण पूर्वेकडील 'ड' प्रभाग कार्यालयात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. यानंतर अग्निशमन दलाचे संजय सरोदे, विजय पाटील आणि सुरेश गायकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला नाल्यातून सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, या तरुणाला भल्यामोठ्या खोल गटारातून काढताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागल्याचे पाहायला मिळाले.