ठाणे - लॉकडाऊनमुळे नाका कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून ठाण्यातील मानपाडा येथे शिवसेनेच्यावतीने दररोज अन्नदान करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा येथील शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी 3 हजाराहून अधिक नाका कामगाराचा जेवणाचा प्रश्न सोडवला आहे.
कोरोनामुळे सर्वच ठप्प झाले असताना हातावर पोट असणाऱ्यांचे एकदम हाल झाले आहेत. शहरात छोटी मोठी कामे करून नाका कामगार आपला प्रपंच सांभाळत असतात, मात्र सद्याची परिस्थिती भयानक असल्याने एकवेळचे जेवण त्याना मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून अनेक मदतीचे हात पुढे येत असताना शिवसैनिक राजेंद्र शिंदे यांनी अन्नदान करण्याचा संकल्प केला आहे. याआधी प्रभागात साखर, कडधान्य, गहू पीठ, कांदे-बटाटे, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला असून लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याचे विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.