ठाणे - भिवंडी लोकसभा भाजप उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्यावर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून आली. ही नाराजी दूर करण्यासाठी भिवंडीतील युतीच्या मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांची बाजू घेतली. तसेच खासदार कपिल पाटील यांना कानपिचक्या दिल्या.
दोन पक्षात समन्वय असणे गरजेचे आहे. भाजप खासदार कपिल पाटील यांच्याकडून शिवसेनेवर अन्याय झाला असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा उपदेश कपिल पाटील यांना दिला. तसेच शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी कपिल पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराचाही त्यांनी समाचार घेतला. तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना सांभाळता तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनासुद्धा सांभाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. यापुढे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता कपिल पाटील यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना, आरपीआय महायुती उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या कार्यकाळात भाजप-सेना पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढत गेला होता. त्यानंतर भिवंडी लोकसभा क्षेत्रात शिवसेना लोकप्रतिनिधी, शिवसैनिक निवडणुकीपासून दोन हात लांब आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांच्या विजयासाठी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांमध्ये समजूत घालण्याचा प्रयत्न करावा लागत आहे, तर गेल्या तीन दिवसांपासून भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी पूर्व पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण या सहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या व्यक्तीच्या मेळाव्यात बहुतांश शिवसेनेचे लोकप्रतिनिधी गैरहजर राहिल्याचे दिसून आले आहे.