ठाणे - फुलांची सजावट, कस्टमाइज केक आणि जोडीला चविष्ट नाश्ता ही सर्व तयारी एखाद्या तरूणाच्या वाढदिवसाची नसून वर्तकनगर येथील 'झेडपी'च्या मैदानाची गेल्या ५० वर्षांपासून निगा राखणाऱ्या 'ग्राउंड रोलर'च्या सन्मान सोहळ्याची होती. आज रविवार असूनही या लाडक्या क्रिकेट रत्नाला अनोखी मानवंदना देण्यासाठी वर्तकनगरात आजी-माजी खेळाडूंच्या आठवणीचा डाव याठिकाणी रंगला. ग्राउंड रोलरचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस जल्लोषात साजरा करताना आयुष्यातील अनेक भागीदारीचा किस्सा येथील खेळाडूंनी मांडला.
वर्तकनगरमधील सिनियर खेळाडूंच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २१ फेब्रुवारी १९७१ रोजी हा ग्राउंड रोलर मैदानात आणण्यात आला. आज त्याला ५० वर्षे पूर्ण झाली. हा रोलर जागचा हलविण्यासाठी सात-आठ जणांची टीम लागते. गोलाकार लोखंडी आणि आतमध्ये सिमेंट काँक्रेट ठासून भरलेल्या या ग्राउंड रोलरने टेनिस क्रिकेटची पंढरी असलेल्या वर्तकनगरच्या मैदानाची नेहमीच निगा राखली. याच मैदानात सुनील गावस्कर, कार्सन घावरी, सलीम दुराणी, सचिन तेंडुलकर, इक्बाल खान, रशीद पटेल या खेळाडूंचा खेळ ग्राउंड रोलरने पाहिला. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अजित पवार यांच्या सभा देखील या रोलरने ऐकल्या आहेत. विशेष म्हणजे, जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याचा देखील हा रोलर साक्षीदार आहे.
हेही वाचा - अवघ्या काही सेकंदात लंपास केला मोबाईल, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
हेही वाचा - ठाण्यात मुस्लिम-ख्रिस्ती बांधवांना दफनभूमीचा वानवा; मरणानंतरही जागेसाठी संघर्ष