ठाणे- प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवकांनी आक्रमक होत ग्रामपंचायतीमधील दप्तर कुलूप बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यातच अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाल्याने महसूल आणि कृषी विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम ग्रामपातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना दिले आहेत. मात्र ग्रामसेवक संपावर असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले असून नुकसानग्रस्त भागातील शेतकरी पर्यायीअधिकारी देण्याची मागणी करत आहेत. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी ठप्प असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
वेतन त्रुटी दूर करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, अतिरिक्त कामे न देणे व पदोन्नती यांच्यासह प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवकांनी या पूर्वीही आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलनाची दखल न घेतल्याने पुन्हा 22ऑगस्टपासून ग्रामसेवकांनी आपल्या कपाटाला कुलूप लावून सरपंचाकडे चाव्या सुपूर्त केल्याने कामकाज ठप्प झाले आहेत. अद्यापही या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. जिल्ह्यातील एकट्या शहापूर तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींमधील 94 ग्रामसेवकांचे कपाट कुलूप बंद असल्याने गावपातळीवरील संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.
चौदावा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जनसुविधा योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजना, वैयक्तिक लाभाच्या विविध योजना, विविध ठराव, नागरिकांना विविध दाखले व सेवा पुरवणे , ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाज, ग्रामसभा, मासिक सभा आदी संपूर्ण कामे ठप्प असल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. तर सिंचन विहीर योजनेचा लाभ, गोठा योजना , आदीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असून या आंदोलनामुळे ठराव मिळणेही कठीण झाले आहे. परिणामी या लाभापासून वंचित राहण्याची भीती शेतकरी व नागरिकांनी वर्तवली आहे.
हेही वाचा- ठाणे विधानसभा आढावा : ठाणे शहराचा बालेकिल्ला कोण सर करणार? भाजप सेनेत चढाओढ