ठाणे - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे जवान २४ तास काम करत आहेत. मात्र, त्यांनादेखील विश्रांतीची गरज आहे, पण ते मिळत नसल्याने त्यांना किमान काम करण्याची शक्ती मिळावी, यासाठी ग्लोबल इंडिया फाऊंडेशनच्या वतीने जवानांना डाबर कंपनीचे प्रोटिनयुक्त साहित्य भेट देण्यात आले आहे.
कोरोनाशी दोन हात करताना एनडीआरएफच्या जवानांमधील उत्साह कायम राहावा, त्यांचा थकवा निघून जावा यासाठी ग्लोबल इंडिया फाऊंडेशनतर्फे त्यांना प्रोटिनयुक्त पदार्थ देण्यात येईल, असा निर्णय संस्थेचे अध्यक्ष नवीन कुमार यांनी घेतला होता. त्यानुसार, एनडीआरएफचे पुणे व मुंबई विभागात कार्यरत जवानांनासाठी तब्बल १५ टन प्रोटिनयुक्त साहित्य भिवंडी तालुक्यातील वडपे येथील डाबर कंपनीच्या डेपोमधून पुणे येथील एनडीआरएफ विभागात पाठविण्यात आले. या वेळी ग्लोबल इंडिया फाऊंडेशनचे सरचिटणीस किशोर मन्याल यांनी डाबर कंपनीचे साहित्य एनडीआरएफ पथकाचे उपनिरीक्षक ईश्वरदास मते यांच्याकडे जमा केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी अमित मन्याल, ओमप्रकाश, बबलू झा व डाबर कंपनीचे डेपो व्यवस्थापक राजेश मुकादमसह आदी लोक उपस्थिती होते.
कोरोनासारख्या भयंकर आजारापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी शासकीय यंत्रणा २४ तास काम करत आहेत. त्यामुळे, त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून त्याच भावनेतून आम्ही एनडीआरएफला मदत केली आहे. तसेच, मुंबई महापालिका कर्मचारी, मुंबई पोलीस, आरोग्य विभागातील कर्मचारी यांना सुद्धा येत्या तीन ते चार दिवसात प्रोटिनयुक्त साहित्य वाटप करणार असल्याची माहिती ग्लोबल इंडिया फाऊंडेशनचे सरचिटणीस किशोर मन्याल यांनी दिली आहे. तसेच, संस्थेने जे प्रोटिनयुक्त साहित्य दिले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत 'पे बॅक टू सोसायटी' ही भावना प्रत्येकामध्ये वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा एनडीआरएफ पथकाचे उपनिरीक्षक ईश्वरदास मते यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीत तापासाठी खास दवाखाने