ठाणे - मोदी सरकारला मुस्लीम बांधवांची चिंता असेल तर मराठ्यांप्रमाणे आरक्षण द्या, असे आव्हान असदुद्दीन ओवैसी यांनी कल्याणमध्ये केले. एमआयएमचे कल्याण पश्चिम मतदार संघाचे उमेदवार ऐय्याज मौलवी यांच्या प्रचार सभेत ओवैसी बोलत होते. यावेळी ओवैसींनी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
पंतप्रधानाना चंद्र दिसतो, सामान्य माणूस दिसत नाही. हे चंद्रावर सॅटेलाईट उतरवू शकतात मात्र, कल्याणमध्ये एक पूल बनवू शकत नाही, अशी टीका ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर केली.
हेही वाचा - कर्जत विधानसभा मतदारसंघ : महायुती विरुद्ध आघाडी अशी सरळ लढत
एमआयएमने जी आश्वासने दिली ती पूर्ण केली आहेत. हैदराबाद, तेलंगाणामधील विकास कामे बघा मग तुम्हाला विश्वास बसेल. कल्याण-ठाण्यामधील विकास कामे रखडली आहेत. कल्याणमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. एक पूल बनवायला यांना इतका वेळ लागतो. तोपर्यंत खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेले. शिवसेना-भाजपकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीत, असे ओवैसी म्हणाले.
भारत सर्वधर्मीयांचा आहे. भारत हिंदू राष्ट्र कधीच नव्हता, ना आम्ही बनू देणार. आम्ही संविधनामुळे आहोत तुमच्या मेहेरबानीवर जगत नाही, असा टोला ओवैसींनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला.