ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील माध्यमिक शालांत परीक्षेत डोंबिवलीतील आजदे पाडा येथील कोमल प्रल्हाद यादव या विद्यार्थिनीने 92% मिळून पालिकेच्या शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी तिची मोठी बहीण प्रिया हिनेही पालिकेच्या शाळेत 91. 60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता. या दोन्ही बहिणींना मराठी विषयात उत्तम गुण मिळाले आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळेत उत्तम शिक्षण मिळत असल्याचे या दोन्ही बहिणींनी सिद्ध केले आहे.
डोंबिवलीच्या पूर्वेकडे स्टेशन जवळ पालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेतील कोमल यादव ने माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी विषयात 84 टक्के हिंदी विषयात 90 टक्के इंग्रजी विषयात 87 टक्के गणित मध्ये 98टक्के, विज्ञान आणि टेक्नॉलॉजी विषयात 91टक्के तर सोशल सायन्स विषयात 94टक्के मिळवले आहेत. या विद्यार्थीनीला एकूण 500 गुणांपैकी 460 गुण मिळाले आहेत. ही विद्यार्थीनी पालिकेची शाळेतून पहिली आली असून वडील प्रल्हाद आणि आई शांती आणि शाळेतील शिक्षकांमुळे यश मिळाल्याचे कोमलने सांगितले.
कोमलची मोठी बहीण प्रियानेही पालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतले होते. तिनेही गेल्या वर्षी पालिकेच्या शाळेतील पहिला क्रमांक मिळाला होता. तीच्या वडिलांची पानाची टपरी असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोमल ला मराठी विषयात 84 टक्के तर प्रियाला गेल्या वर्षी मराठी विषयात 82 टक्के मिळाले होते.