ठाणे - भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील 17 वर्षीय अल्पवयीन प्रियसीचा पैशांच्या लोभापायी प्रियकराने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून करून फरार झालेल्या प्रियकराला नारपोली पोलिसांच्या पथकाने सापळा रचून उत्तर प्रदेश मधील फैजाबाद जिल्ह्यातील आशापूर या गावातून अटक केली आहे. समीर रफिकुल्लाह खान ( वय 23 ) असे पोलिसांनी अटक केलेल्या खुनी प्रियकराचे नाव आहे. तर नेहा विश्वकर्मा असे मृतक 17 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक नेहा आणि आरोपी समीर हे दोन वर्षांपूर्वी हायवे दिवे गावातील एका चाळीत शेजारीशेजारी राहायचे. त्यावेळी त्यांचे सूत जुळून प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र या प्रेमसंबंधाची कुणकुण नेहाच्या घरच्यांना लागताच त्यांनी विरोध केला. यामुळे भविष्यात आपल्या दोघांचे लग्न होणार नाही, अशी भीती या दोघांनाही वाटत होती. त्यामुळे दोघांनीही घरातून पळून जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार 5 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजताच्या सुमारास नेहा ही शौचास जाऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली. घरातून निघताना तिने घरातील दागिने व काही पैसे घेऊन निघाली होती. ठरल्याप्रमाणे खुनी प्रियकर समीर हा घटनास्थळी येऊन आधीच उभा होता. त्यावेळी मृतक नेहाने दागिने व पैसे कमी आणल्याने त्याने तिच्याशी वाद घातला. यामुळे दोघांमध्ये भांडण होऊन प्रियकर समीरने ओढणीच्या साह्यानेच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला झुडपात टाकून तो तेथून फरार झाला होता.
पोलिसांनी त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेश मधील फैजाबाद जिल्ह्यातील आशापुर या गावी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे हे पोलीस पथकांसह 7 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश मध्ये दाखल होऊन त्यांनी नेहा तिचा खून करणारा प्रियकर समीरला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याला अटक केली. त्यानंतर त्याला तेथील स्थानिक न्यायालयात हजर करून त्याच्याकडून 54 हजार 500 रुपयांची रोकड आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. नारपोली पोलिसांचे पथक शनिवारी रात्री उशिरा भिवंडीत दाखल झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांनी दिली आहे.