ठाणे - शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नुकतीच घटना घडली होती. कुटुंबियांनी तिचा दफनविधीही केला. मात्र, विद्यार्थिनीच्या अकस्मात आत्महत्येने संशय बळावल्याने आल्याने शहापूरचे तहसीलदार व आरोग्य अधिकाऱ्यांनी मुलीचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थिनीवर दुसऱ्यांदा अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - धुळ्यात लाचखोर मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
शहापूर तालुक्यातील कुल्हे शासकीय आश्रमशाळेतील अंजली गुरुनाथ पारधी (वय १६) या विद्यार्थिनीने ११ सप्टेंबरला दुपारी आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांनी दफनविधी केला होता. गणेशोत्सवाच्या सुट्टीनिमित्त ही विद्यार्थिनी आश्रमशाळेतून गावी आली होती. तिने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, तिच्या अकस्मात आत्महत्येने संशय बळावल्याने रास गावातील नागरिक बाळू बरोरा यांनी वासिंद पोलीस ठाण्यात माहिती देऊन कळवले होते. बरोरा यांच्या माहितीच्या आधारे वासिंद पोलिसांनी न्यायीक आदेश मिळवून जमिनीत पुरलेला मृतदेह गुरुवारी बाहेर काढून शवविच्छेदनाकरीता मुंबईतील जे जे रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. हा मृतदेह पुन्हा कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला असून त्यावर शनिवारी दुसऱ्यांदा अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
दरम्यान, विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या कारणांचा अधिक तपास सुरू असून जे जे रुग्णालयातील शवचिकित्सेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे वासिंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एल. मोरे यांनी माहिती देताना सांगितले.
हेही वाचा - आईला उसने पैसे देण्यास नकार; अल्पवयीन विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची चाकू भोसकून हत्या